‘एमएआर लीग’ अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेचे १७ नोव्हेंबरपासून आयोजन !!
पुणे, १२ नोव्हेंबरः ‘एमएआर लीग’ अजिंक्यपद करंडक बॉक्स् क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा १७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२४ या कालावधीत लोहगांव येथील रन-३६० टर्फ मैदानावर होणार आहे. या स्पर्धेत पुणे आणि परिसरातील १२ संघ सहभागी होणार असून स्पर्धेत एकूण ५० हजार रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक अजय नायर आणि सुमित बिजलानी यांनी सांगितले की, स्पर्धेला टर्बन टायटन्स् यांनी प्रायोजकत्व दिले आहे. पुणे शहरामध्ये प्रोफेशनल क्रिकेट खेळणार्या एक वर्ग आहे तसेच हौशी क्रिकेट खेळणारे आणि आवडणारेसुद्धा अनेक खेळाडू आहेत. आपले कार्यालयीन कामकाज सांभाळून आपल्या आवडत्या क्रिकेटचा छंद जोपासणारा खुप मोठा वर्ग आहे. पुण्यामध्ये विविध माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्यालयांमधील हौशी खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहे. त्यांच्यामधील कौशल्य आणि गुणवत्ता दाखवण्याची संधी या स्पर्धेव्दारे मिळणार आहे. या स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटातील एकूण १२ संघ सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे सामने केवळ आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी खेळवण्यात येणार आहेत. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या या स्पर्धेत इनव्हिजन, ग्रीन पार्क, टर्बन टायटन्स्, द लिंजड्स, सीडी इलेव्हन, झेडएस संघ, तनिष पर्ल्स सोसायटी, वॉरीयर्स टायटन्स्, ग्रीन रॉक्झ, अनप्रीडिक्टेबल क्लब, अनस्टॉपेबल इलेव्हन, या १२ निमंत्रित संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला २४ हजार रूपये आणि करंडक तर, उपविजेत्या संघाला १२ हजार रूपये आणि करंडक मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिके रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.

