लायन शंतनु सिद्धा स्मृतीप्रित्यर्थ तिसरी ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२५ स्पर्धा !!

 

रिस्क्राईब, रायगड वॉरीयर्स संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला !!

पुणे, ११ मार्चः स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित लायन शंतनु सिद्धा स्मृतीप्रित्यर्थ तिसर्‍या ‘लायन्स् प्रौढ करंडक’ (४० वर्षावरील) टी-२० क्रिकेट स्पर्धेत रिस्क्राईब आणि रायगड वॉरीयर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस गाजवला.येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत मनोहर पाटील याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रिस्क्राईब संघाने गार्गी एज्युकॉन संघाचा ७ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना गार्गी एज्युकॉनने १२१ धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये तनिष्क ठक्कर याने ३७ धावांचे योगदान दिले. मनोहर पाटील याने १७ धावांमध्ये ५ गडी बाद करून गार्गी एज्युकॉन संघाचा डाव मर्यादित ठेवला. हे लक्ष्य रिस्क्राईब संघाने १७.४ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. नितीन कुचेकर याने ५४ धावांची तर, अरविंद चौहान याने ४७ धावांची खेळी करून संघाला विजयी सलामी दिली.

सिकंदर पाटील याने केलेल्या फलंदाजीच्या जोरावर रायगड वॉरीयर्सने एलिट क्रिकेट क्लब संघाचा ९ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एलिट क्रिकेट क्लबने १३६ धावांचे लक्ष्य उभे केेले. नवनाथ साठे (४६ धावा), विवेक लोंढे (२७ धावा) आणि नवनाथ पाटील (नाबाद २७ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. ही धावसंख्या रायगड वॉरीयर्सने १५ षटकात व १ गडी गमावून पूर्ण केली. यामध्ये सिकंदर पाटील याने नाबाद ५४ धावांची तर, विनोद भोईर याने नाबाद ५३ धावांनी खेळी करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

स्पर्धेचे उद्घाटन भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू तेजल हसबनीस हिच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ला. दत्ता शृंगारे, ला. विजय शितोळे, ला. तुषार शिंदे, ला. प्रवेश जठार तसेच स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंटचे सनी मारवाडी आणि अमित काळे आदि मान्यवर उपस्थित होते.

सामन्याचा संक्षिप्त निकालः
गार्गी एज्युकॉनः १९.४ षटकात १० गडी बाद १२१ धावा (तनिष्क ठक्कर ३७, जॉन वाघमारे २०, हृषीकेश शिंदे २४, मनोहर पाटील ५-१७) पराभूत वि. रिस्क्राईबः १७.४ षटकात ३ गडी बाद १२२ धावा (नितीन कुचेकर ५४ (४६, ३ चौकार, ३ षटकार), अरविंद चौहान ४७, हृषीकेश शिंदे १-१९); सामनावीरः मनोहर पाटील;

एलिट क्रिकेट क्लबः २० षटकात ६ गडी बाद १३६ धावा (नवनाथ साठे ४६, विवेक लोंढे २७, नवनाथ पाटील नाबाद २७, प्रितम कैया २-२५) पराभूत वि. रायगड वॉरीयर्सः १५ षटकात १ गडी बाद १३९ धावा (सिकंदर पाटील नाबाद ५४ (३९, ७ चौकार, १ षटकार), विनोद भोईर नाबाद ५३ (३७, ८ चौकार, १ षटकार), नवनाथ साठे १-२७); सामनावीरः सिकंदर पाटील;

फोटो ओळीः स्पर्धेचे पारंपरिक पद्धतीने पूजा करून उद्घाटन करताना भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू आणि पुण्याची तेजल हसबनीस. तेजल हसबनीस हिच्यासोबत उपस्थित प्रमुख पाहुणे.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!