‘लायन्स् प्रीमियर लीग’ २०२४-२५ क्रिकेट स्पर्धा
साची सुपरकिंग्ज् संघाला विजेतेपद !!
हिंजेवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना रूद्र वॉरीयर्सने १३८ धावा धावफलकावर लावल्या. मधल्या फळीतील फलंदाज सागर कांबळे याने ३४ धावांची खेळी केली, ही डावामधील सर्वाधिक धावांची ठरली. साची संघाच्या अनिल मांडके याने ११ धावांमध्ये २ गडी बाद केले. संतोषकुमार सांगळे याने गोलंदाजीमध्ये १ गडी बाद करताना दोन गडी धावबाद केले आणि एक सुंदर झेलही घेतला. हे लक्ष्य साची सुपरकिंग्ज्ने १७.२ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. डावामध्ये अरविंद चव्हाण (३८ धावा), हिकांत कामदार (३० धावा), अमर खेडेकर (१७ धावा), साजन मोदी (१६ धावा) आणि संतोषकुमार सांगळे (१६ धावा) यांनी धावा जमवून संघाला सहज विजयासह स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण लायन्स् क्लब डिस्ट्रीक्ट ३२३४डी२ डिस्ट्रीक्ट कॅबिनेट ऑफिसर राजेंद्र गोयल, डिस्ट्रीक्ट कॅबिनेट ऑफिसर रवि गोलार, लायन्स् प्रीमियर लीगचे मार्गदर्शक वसंतभाऊ कोकणे आणि मेन्टॉर अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लायन्स् क्लब डिस्ट्रीक्ट ३२३४डी२चे क्रीडा प्रमुख भुपेंद्रसिंग धुल्लट, स्पर्धेतील प्रशिक्षक, खेळाडू आदि उपस्थित होते. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक आणि मेडल्स् देण्यात आली.
अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः
रूद्र वॉरीयर्सः २० षटकात ९ गडी बाद १३८ धावा (सागर कांबळे ३४, सौरभ रवालिया १९, पराग सराफ नाबाद १६, अनिल मांडके २-११, अशोक अय्यर १-७) पराभूत वि. साची सुपरकिंग्ज्ः १७.२ षटकात ६ गडी बाद १३९ धावा (अरविंद चव्हाण ३८, हिकांत कामदार ३०, अमर खेडेकर १७, साजन मोदी १६, संतोषकुमार सांगळे १६, अर्थव तांदळे २-१५, पराग सराफ २-२३); सामनावीरः संतोषकुमार सांगळे;
वैयक्तिक पारितोषिके-
स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः संतोषकुमार सांगळे (१५० धावा, ९ विकेट, साची सुपरकिंग्ज्);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः दिग्विजय मोहीते (१८७ धावा, नायर ईगल्स्);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः प्रशांत तेलंग (११ विकेट, रिस्क्राईब);
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकः आनंद कामठे (८ विकेट, रिस्क्राईब);
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकः हिकांत कामदार (८ विकेट, साची सुपरकिंग्ज्);
फोटो ओळीः स्पर्धेचा विजेता साची सुपरकिंग्ज् संघ करंडकासह.