‘एसए-आरके करंडक’ १५ वर्षाखालील मुलींची आंतरक्लब क्रिकेट स्पर्धा !!
एसएआरके क्रिकेट अॅकॅडमीला विजेतेपद !!
SA-RK Cricket Academy Team
मांजरी येथील पीजी क्रिकेट मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना एसएआरके क्रिकेट अॅकॅडमीने ४० षटकामध्ये ६ गडी गमावून १८५ धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये सलामीवीर माही सुंकाळे हिने ३५ धावांची खेळी केली. माही आणि आर्या व्यास (१७ धावा) यांनी ११७ चेंडूंमध्ये ५६ धावांची सलामी दिली. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या पर्णवी बनसोडे (३४ धावा), स्वरा गाडे (२८ धावा) आणि अनुष्का राठोड (१८ धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाला १८० धावांचा टप्पा गाठून दिला. या लक्ष्याचा पाठलाग करताना विनर्स क्रिकेट अॅकॅडमीचा डाव ३४.३ षटकात १२३ धावांवर आटोपला. विनर्सकडून अवंती तुपे (२७ धावा), गायत्री हांडे (२५ धावा) आणि सोनल शिंदे (१८ धावा) यांनी छोट्या खेळी करून प्रतिकार केला. सृष्टी भुजबळ हिने ३१ धावांमध्ये ३ गडी बाद केले. तसेच अनुष्का राठोड हिने २ गडी तर, माही सुंकाळे हिने एक बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक शिवलिंग अन्शीरे आणि रफिक किरगोडी यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या एसएआरके क्रिकेट अॅकॅडमी संघाला आणि उपविजेत्या विनर्स क्रिकेट अॅकॅडमी संघाला मेडल्स् आणि करंडक देण्यात आले. या एकदिवसीय स्पर्धेत एसएआरके क्रिकेट अॅकॅडमी, विनर्स क्रिकेट अॅकॅडमी यांच्यासह एसपीएम अॅकॅडमी आणि ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमी हे दोन संघ सहभागी झाले होते. उत्तम गुण आणि सरासरी धावगतीच्या आधारे एसएआरके आणि विनर्स संघांनी अंतिम फेरी गाठली होती.
अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः
एसएआरके क्रिकेट अॅकॅडमीः ४० षटकात ६ गडी बाद १८५ धावा (माही सुंकाळे ३५, पर्णवी बनसोडे ३४, स्वरा गाडे २८, अनुष्का राठोड १८, अवंती तुपे २-३८, श्रेयशी २-३४) वि.वि. विनर्स क्रिकेट अॅकॅडमीः ३४.३ षटकात १० गडी बाद १२३ धावा (अवंती तुपे २७, गायत्री हांडे २५, सोनल शिंदे १८, सृष्टी भुजबळ ३-३१, अनुष्का राठोड २-२९, माही सुंकाळे १-१७); सामनावीरः माही सुंकाळे;
फोटो ओळीः स्पर्धेचा विजेता एसएआरके क्रिकेट अॅकॅडमी संघ करंडकासह.