पुनित बालन ग्रुप आणि इन्स्पायर स्पोटर्स इन्स्टिट्यूट प्रस्तुत

महाराष्ट्र ज्यूदो संघटने तर्फे पुण्यामध्ये खुल्या सबज्युनियर आणि कॅडेट स्पर्धांचे आयोजन !!

२० वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय ज्यूदो खेळाडूंचा थरार पहाता येणार !!

पुणे, दि. १५ जानेवारीः दोन दशकांच्या (२० वर्षांनंतर) कालावधीनंतर महाराष्ट्रात खुल्या सबज्युनियर आणि कॅडेट अशा दोन राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील ज्यूदोप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी असणार आहे. पुनित बालन ग्रुप आणि इन्स्पायर स्पोटर्स इंन्स्टिट्यूट प्रस्तुत या स्पर्धेत ३० राज्यांमधील सुमारे १२०० ज्यूदोपटू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे महासचिव श्री. शैलेश टिळक यांनी सांगितले की, ज्यूदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली सब-ज्यूनियर आणि कॅडेट गटातील ही स्पर्धा बालेवाडी-म्हाळूंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल येथे दि. १७ ते २४ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन बेल्लारी येथील इन्स्पायर स्पोटर्स इंन्स्टिट्यूट आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या सहकार्याने तसेच पुण्यातील युवा उद्योजक आणि महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे प्रमुख आधारस्तंभ पुनीत बालन यांच्या आर्थिक मदतीने करण्यात आलेले आहे. पत्रकार परिषदेमध्ये संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले आणि तांत्रिक समिती सचिव दत्ता आफळे हे उपस्थित होते.

महाराष्ट्र अ आणि ब अशा दोन संघांसह पंजाब, दिल्ली, हरियाणा, केरळ, पॉन्डेचरी, मध्यप्रदेश, गुजरात अशा देशातील ३० राज्यांतील जवळपास १२०० ज्यूदोपटू सहभागी होणार आहेत. यामध्ये सबज्युनिअर्स (१५ वर्षाखालील) गटामध्ये ६०० मुले आणि मुली तर कॅडेट (१५ ते १८ वर्षाखालील) गटामध्ये ६०० मुले आणि मुली सहभागी होणार आहेत. सबज्युनियर गटामध्ये ९ मुली आणि ९ मुलांचे वजन गट असून कॅडेट गटामध्ये ८ मुली आणि ८ मुले वजन गट असणार आहेत. याशिवाय प्रत्येक संघासोबत प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि पदाधिकारी या स्पर्धेनिमित्त पुणे शहरामध्ये येणार आहेत. स्पर्धेसाठी ६० तज्ञ पंचांची नियुक्ती ज्यूदो फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे करण्यात आलेली असून ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पंचांचाही सहभाग असणार आहे.

भोपाळ येथील केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खेळ प्रशिक्षण संस्थेत सराव करणारी तसेच पर्थ, ऑस्ट्रेलिया येथील ज्युनियर आणि कॅडेट गटात सुवर्णपदक विजेती ज्युनियर ७८ किलोखालील गटातील कंवरप्रीत कौर, युरोपियन कपमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी मणिपूरची दिपापती अशा नामांकित खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

स्पर्धेचे सब-ज्युनियर्स गटाच्या स्पर्धांचे उद्घाटन रविवार, दि. १९ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजता केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार नामदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार असून यावेळी उद्योजक पुनित बालन आणि आय.आय.एस.चे प्रतिनिधी तथागत मुखर्जी हे मान्यवर उपस्थित असणार आहे. सब-ज्युनिअर्सच्या स्पर्धा १९ आणि २० जानेवारी या दोन दिवशी तीन मॅट एरियावर घेण्यात येणार आहेत. कॅडेट गट स्पर्धेचे उद्घाटन दि. २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी क्रीडा मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्यासह आय.आय.एस.च्या अध्यक्षा मनीषा मल्होत्रा आणि पुनित बालन उपस्थित असणार आहेत. या स्पर्धा दि. २३ आणि २४ जानेवारी दरम्यान होणार आहे.

या स्पर्धांच्या कार्यक्रमा दरम्यान क्रीडा क्षेत्रातील मान्यवर ऑलिंपिक खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेते स्वप्निल कुशाळे, सचिन खिलारे, अंजली भागवत आदीना आमंत्रित करण्यात आले आहे.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!