‘एसए-आरके करंडक’ १२ वर्षाखालील मुलांची आंतरक्लब क्रिकेट स्पर्धा !!
ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमी, ट्रिनिटी स्पोटर्स अॅकॅडमी उपांत्य फेरीत !
Bhujang Dhulgunde
मांजरी येथील पीजी क्रिकेट मैदान आणि हांडेवाडी येथील एसए-आरके अॅकॅडमी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत स्वरा गाडे हिने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमीने क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमीचा ८ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळणार्या क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमीचा डाव ८० धावांवर गडगडला. ब्रिलीयंट्सच्या स्वरा गाडे हिने ५ धावांमध्ये ३ गडी बाद करून सुरेख गोलंदाजी केली. तिला दुसर्या बाजुने प्रणय आवळे याने साथ दिली. त्याने १७ धावांमध्ये ३ गडी टिपले. हे लक्ष्य ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमीः १२.२ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. रूद्र पाबळे याने ३६ धावांची आणि रितम सेन याने नाबाद २५ धावांची खेळी करून संघाला सहज विजय मिळवून दिला.
भुजंग धुळगुंडे याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे त्रिनिटी स्पोटर्स अॅकॅडमीने एस्क्वेअर स्पोर्ट्स अॅकॅडमीचा ३८ धावांनी सहज पराभव करून अंतिम चार संघांमध्ये आपले नाव निश्चित केले. पहिल्यांदा खेळणार्या त्रिनिटी स्पोटर्स अॅकॅडमीने २५ षटकामध्ये १६३ धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये विहान हुगे (३८ धावा), गुरू राजोळे (२९ धावा), भुजंग धुळगुंडे (२६ धावा) आणि युवराज चौंडकर (२० धावा) यांनी संघाला धावा जमवून दिल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना एस्क्वेअर स्पोर्ट्स अॅकॅडमीचा डाव १२५ धावांवर मर्यादित राहीला. इझान इनामदार याने ३५ धावांची आणि शौर्य तावरे याने ३० धावांची खेळी केली. परंतु यांच्याशिवाय खेळपट्टीवर कोणताही फलंदाज धावा करू शकला नाही. अर्णव धावरे आणि सुजल राणे या दोघांनी प्रत्येकी दोन तर, भुजंग धुळगुंडे याने एक गडी बाद करून संघाचा विजय सोपा केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्यपुर्व फेरीः
क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमीः २३.२ षटकात १० गडी बाद ८० धावा (समर्थ इंगळे २७, अव्देत अमोंडकर १४, स्वरा गाडे ३-५, प्रणय आवळे ३-१७) पराभूत वि. ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमीः १२.२ षटकात २ गडी बाद ८१ धावा (रूद्र पाबळे ३६, रितम सेन नाबाद २५, समर्थ इंगळे १-१७); सामनावीरः स्वरा गाडे;
त्रिनिटी स्पोटर्स अॅकॅडमीः २५ षटकात ६ गडी बाद १६३ धावा (विहान हुगे ३८, गुरू राजोळे २९, भुजंग धुळगुंडे २६, युवराज चौंडकर २०, शौर्य तावरे २-१४) वि.वि. एस्क्वेअर स्पोर्ट्स अॅकॅडमीः २५ षटकात ९ गडी बाद १२५ धावा (इझान इनामदार ३५, शौर्य तावरे ३०, अर्णव धावरे २-२६, सुजल राणे २-१५, भुजंग धुळगुंडे १-४); सामनावीरः भुजंग धुळगुंडे.