‘अभिषेक ठाकूर करंडक’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टे्न्टी-२० क्रिकेट स्पर्धा
विजय क्रिकेट क्लबची विजयी सुरूवात; एमईएस अॅकॅडमी संघाची आगेकूच !!
पुणे, २८ डिसेंबरः पुणे क्रिकेट अॅकॅडमी आणि सागर कांबळे यांच्यावतीने कै. अभिषेक ठाकूर यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘अभिषेक ठाकूर करंडक’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टे्न्टी-२० क्रिकेट २०२४-२५ स्पर्धेत वि जय क्रिकेट क्लबने संघाने स्पर्धेत विजयी सुरूवात केली. एमईएस संघाने दोन सामन्यांमधून एक विजय मिळवत आगेकूच केली.
मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत सिद्धेश वारघंटे याने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे विजय क्रिकेट क्लबने एमईएस संघाचा १३ धावांनी निसटता पराभव केला. पहिल्यांदा खेळताना विजय क्रिकेट क्लबने १९५ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये सिद्धेश वारघंटे याने २४ चेंडूत ४ चौकारांसह ५० धावा चोपल्या. याशिवाय अजिंक्य गायकवाड (३५ धावा), निपुण गायकवाड (३१ धावा) आणि अमित राठोड (२५ धावा) यांनी संघाकडून धावांचे योगदान दिले. एमईएस अॅकॅडमीने या धावसंख्येचा पाठलाग करताना १८२ धावांपर्यंत मजल मारली. अजित गव्हाणे याने ४७ धावांची तर, सुजित उबाळे याने २२ धावा आणि सागर बिरदावडे याने २२ धावांची खेळी केली. विजय संघाकडून श्रीनिवास लेहेकर याने ३ गडी तर, गौरव कुमकर याने २ गडी बाद केले.
दुसर्या सामन्यामध्ये यश बोरामणी याने केलेल्या ५२ धावांच्या जोरावर एमईएस अॅकॅडमीने नॉक ९९ क्लबचा २४ धावांनी पराभव करून गुणांचे खाते उघडले. पहिल्यांदा फलंदाजी करणार्या एमईएस अॅकॅडमीने २० षटकामध्ये २२२ धावांचा डोंगर उभा केला. यश बोरामणी याने ५२ धावांची तर, आशिष उदगे याने ५२ धावांची खेळी केली. अजित गव्हाणे (३५ धावा) आणि अजिंक्य नाईक (२५ धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या दोनशेच्यापार केली. नॉक ९९ क्लबसुद्धा कडवा प्रतिकार केला. त्यांनी २० षटकात १९८ धावा केल्या. नॉक ९९कडून सुरज शिंदे याने ४९ धावांची तर, अभिमन्यु जाधव याने ४० धावांची खेळी केली.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
विजय क्रिकेट क्लबः २० षटकात ५ गडी बाद १९५ धावा (सिद्धेश वारघंटे ५० (२४, ४ चौकार), अजिंक्य गायकवाड ३५, निपुण गायकवाड ३१, अमित राठोड २५, सागर बिरदावडे २-२४) वि.वि. एमईएस अॅकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद १८२ धावा (अजित गव्हाणे ४७, सुजित उबाळे २२, सागर बिरदावडे २२, श्रीनिवास लेहेकर ३-१८, गौरव कुमकर २-३०); सामनावीरः सिद्धेश वारघंटे;
एमईएस अॅकॅडमीः २० षटकात ७ गडी बाद २२२ धावा (यश बोरामणी ५२ (१९, ६ चौकार, ४ षटकार), आशिष उदगे ५२ (२५, ७ चौकार, २ षटकार), अजित गव्हाणे ३५, अजिंक्य नाईक २५, कृष्णा मार्तंड २-२६, सागर होगाडे २-३७) वि.वि. नॉक ९९ क्लबः २० षटकात ९ गडी बाद १९८ धावा (सुरज शिंदे ४९, अभिमन्यु जाधव ४०, रोहन दामले २६, आयुष रक्तडे २०, सिद्धार्थ नक्का २-२५, धनराज परदेशी २-४०); सामनावीरः यश बोरामणी.