पुणे, २४ डिसेंबरः पुणे क्रिकेट अॅकॅडमी आणि सागर कांबळे यांच्यावतीने कै. अभिषेक ठाकूर यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘अभिषेक ठाकूर करंडक’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टे्न्टी-२० क्रिकेट २०२४-२५ स्पर्धेत मुंडे स्पोर्ट्स क्लब आणि हेमंत पाटील अॅकॅडमी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत यश देशमुख याने केलेल्या ८० धावांच्या जोरावर मुंडे स्पोर्ट्स क्लबने मुंबईच्या एसी डायनामाईट संघाचा १४९ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळणार्या मुंडे स्पोर्ट्स क्लबने १८ षटकात ७ गडी गमावून २४९ धावांचा डोंगर उभा केला. यश देशमुख याने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह ८० धावा चोपल्या. संकेत माने याने नाबाद ७९ धावांची खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना एसी डायनामाईटचा डाव १०० धावांवर आटोपला. अमोल कदम (३८ धावा) आणि ओम साळुंखे (२२ धावा) यांनी लढा दिला. परीक्षीत वालसंगकर याने ३ गडी तर, वसंत मुंडे याने २ गडी बाद केले.
स्वप्निल फुलपगार याने झळकावलेल्या १३५ धावांच्या खेळीमुळे हेमंत पाटील अॅकॅडमीने मुंडे क्लबचा १६ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करणार्या हेमंत पाटील अॅकॅडमीने २३३ धावा धावफलकावर लावल्या. स्वप्निल फुलपगार याने ६५ चेंडूत १६ चौकार आणि ८ षटकारांसह १३५ धावांची खेळी साकारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंडे स्पोर्ट्स क्लबचा डाव २१७ धावांवर मर्यादित राहीला. यामध्ये ध्रुविल माटकर याने नाबाद ६५ खेळी केली. याशिवाय रविंद्र जाधव (३१ धावा) आणि आकाश पारकर (२८ धावा) आणि विश्वजीत जगदाळे (२७ धावा) यांनीही छोट्या खेळी करून लढत दिली. यश खळदकर याने ४४ धावांमध्ये ४ गडी बाद केले. अथर्व वानवे आणि प्रतिक भुमीबर यांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले.
स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राचा माजी रणजीपटू कै. अभिषेक ठाकूर यांचे वडील नरेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक सागर कांबळे, सहभागी संघातील खेळाडू, प्रशिक्षक आदि मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत पुणे, मुंबई येथील एकूण २० संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक आणि १ लाख रूपये तर, उपविजेत्या संघाला ५० हजार रूपये आणि करंडक देण्यात येणार आहे.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
मुंडे स्पोर्ट्स क्लबः १८ षटकात ७ गडी बाद २४९ धावा (यश देशमुख ८० (३६, ७ चौकार, ६ षटकार), संकेत माने नाबाद ७९ (३२, ५ चौकार, ८ षटकार), मयुर गिड्डे २७, बंटी मांडेकर ४-३९, एस. चव्हाण २-६२) वि.वि. एसी डायनामाईटः १७.२ षटकात १० गडी बाद १०० धावा (अमोल कदम ३८, ओम साळुंखे २२, परीक्षीत वालसंगकर ३-५, वसंत मुंडे २-२६); सामनावीरः यश देशमुख;
हेमंत पाटील अॅकॅडमीः २० षटकात ५ गडी बाद २३३ धावा (स्वप्निल फुलपगार १३५ (६५, १६ चौकार, ८ षटकार), ऋतुराज वीरकर ३८, दिग्विजय जाधव २७, परीक्षीत वालसंगकर २-३०) वि.वि. मुंडे स्पोर्ट्स क्लबः १८.३ षटकात १० गडी बाद २१७ धावा (ध्रुविल माटकर नाबाद ६५ (२९, ४ चौकार, ६ षटकार), रविंद्र जाधव ३१, आकाश पारकर २८, विश्वजीत जगदाळे २७, यश खळदकर ४-४४, अथर्व वानवे २-२३, प्रतिक भुमीबर २-२६); सामनावीरः स्वप्निल फुलपगार.

