‘पीडीएफए युथ लीग’ स्पर्धेचे १४ डिसेंबर पासून आयोजन !!
लीगमध्ये चाळीसहुन अधिक फुटबॉल क्लबचे १७० संघ, २५०० खेळाडू सहभागी होणार !!
पुणे, १३ डिसेंबरः आर.एम. स्पोटर्स कन्सेप्ट्स आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) यांच्यावतीने ‘पीडीएफए युथ लीग’ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील चाळीसहून अधिक फुटबॉल क्लबचे १७० संघ आणि सुमारे २५०० खेळाडू सहभागी होणार आहेत.
स्पर्धेबाबत अधिक पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना नॉर्थईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबचे सीईओ आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष श्री. मंदार ताम्हाणे, पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष श्री. प्यारेलाल चौधरी, आर.एम. स्पोटर्स कन्सेप्ट्सचे संस्थापक-अध्यक्ष रायेश महेरनोश, आर.एम. स्पोटर्स कन्सेप्ट्सचे सहभागिदार चैतन्य काकोडे म्हणाले की, पीडीएफएला आर.एम. स्पोटर्स कन्सेप्ट्स यांच्या भागिदारीत नवीन जिल्हास्तरीय युवा लीग स्पर्धेची घोषणा करताना आनंद होत आहे. ही लीग म्हणजेच खेळाडूंसाठी लहान वयातच दिशा देणारा मार्ग ठरणार असून स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी, युवा प्रतिभेला व शारिरीक तंदुरूस्तीला प्रोत्साहन, खेळाव्दारे सांघिक भावना निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेला परिवर्तकारी उपक्रम ठरणार आहे.
या स्पर्धेच्या फॉरमॅट विषयी सांगताना ते म्हणाले की, ७, ९, ११, १३, १५ आणि १७ वर्षाखालील अशा एकूण मिळून ६ गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या सर्व वयोगटात मुलांसोबतच मुलींचासुद्धा सहभाग प्रत्येक वयोगटातील संघांमध्ये असणार आहे. १४ डिसेंबर २०२४ पासुन या स्पर्धेला सुरूवात होणार असून सलग पाच महिने या स्पर्धेचे सामने खेळवण्यात येणार आहे.
या स्पर्धेची बाद फेरी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल मैदानावर मे २०२५ महिन्यामध्ये होणार आहे. हे सामने इंडिया खेलो फुटबॉल (आयकेएफ) या आमच्या अधिकृत स्काऊटींग भागीदार येथे थेट प्रसारीत करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणार्या खेळाडूंना इंडिया खेलो फुटबॉल झोनल फायनल स्पर्धेत खेळण्याचीसुद्धा संधी मिळणार आहेत. या खेळाडूंची कामगिरीचे मुल्यमापन करण्यासाठी आणि निवडीसाठी स्काऊट्सचे ऑफिशियल्स् संपूर्ण लीगमध्ये उपस्थित राहून निरिक्षण करणार आहेत.
सर्व मुलांना सोयीचे जावे यासाठी स्पर्धेचे सामने प्रत्येक आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी होणार आहेत. स्पर्धेचे सामने हे प्लेझेन-मँगो टीवर्ल्ड (चांदणी चौक), मॅचडे अरेना (वाकड), स्पोर्टझी अरेना (रहाटणी) आणि भारती विद्यापीठ (कात्रज) या मैदानांवर होणार आहे.
स्पर्धेच्या ७ वर्षाखालील गटात ३-अ-साईड, ९ वर्षाखालील गटात ५-अ-साईड, ११ वर्षाखालील गटात ७-अ-साईड, १३ वर्षाखालील गटात ९-अ-साईड आणि १५ आणि १७ वर्षाखालील गटात पूर्ण ११ खेळाडूंचे सामने होणार आहेत. एफआयएफएफच्या ब्ल्यु कब्ज् आणि एफआयएफएफच्या युथ लीग या फॉरमॅट नुसार या स्पर्धेची आखणी करण्यात आली आहे.
स्पर्धेतील सर्व वयोटातील विजेत्या संघांना करंडक आणि मेडल्स् देण्यात येणार आहेत. या शिवाय स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, सर्वाधिक गोल करणार्या खेळाडूला गोल्डन बुट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट लीग खेळाडू, फेअर प्ले पुरस्कार, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार आणि प्रत्येक सामन्यासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू अशा वैयक्तिक आणि सांघिक पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे. या शिवाय स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूला प्रशस्तीपत्रकही देण्यात येणार आहे.